- शाळेतील विविध उपक्रमांची केली पाहणी : शिक्षक, विद्यार्थ्यांचे केले कौतुक
कर्जत – रायगड जिल्हा परिषदेच्या झुगरेवाडी शाळेने विविध उपक्रम राबवून कर्जत तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळवले आहेत. या शाळेची पाहणी करण्यासाठी कर्जत तालुक्याचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी भेट देऊन, शाळेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची पाहणी केली.
करोनाचा संकट आणि त्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या शाळेला विविध संस्थाच्या मदतीने शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी नवीन झळाळी दिली. शाळेच्या छताची झालेली पडझड जुन्या वर्गाची दुरुस्ती केली त्याचप्रमाणे शाळेची रंगरंगोटी करून शाळेला नवा साज चढविला आहे.
याशिवाय लॉकडाऊनच्या काळात केलेले झुगरेवाडी ग्रामस्थांना धान्यवाटप, शाळेतील रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट्, अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिगत बंधारे या सर्व कामाचा आढावा गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी घेतला. भविष्यात करावयाच्या कामाची माहिती घेऊन, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली. यावेळी इंग्रजी विषयात विशेष प्राविण्य असणाऱ्या विद्यार्थी नयन झुगरे, सत्यम खडके, छकुली खडके हे विद्यार्थी त्याच्या पुढील इयत्तेच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकाचे वाचन करून दाखवले.
एक जुलैपासून या शाळेतील ऑफलाइन शिकवणीमुळे विद्यार्थ्यांना झालेला फायदा पाहून सर्व शिक्षक व मुख्याध्यापक रवी काजळे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.
मुख्याध्यापक रवी काजळे यांना राज्य पुरस्कारात मिळालेल्या रकमेपैकी साठ हजार रुपये रक्कम गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. सर्व शिक्षक सहकारी उत्तम प्रकारे मेहनत घेत असल्याने शाळेची गुणवत्ता वाढून शाळेचे नावलौकिक झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
त्याचप्रमाणे नांदगाव केंद्रात विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेले केंद्रप्रमुख गोविंद दरवडा यांचे कौतुक केले. ज्या संस्थांनी शाळेला मदत केली, त्या सर्वांचा नामोल्लेख करून आभार व्यक्त केले.
या वेळी स्थापत्य अभियंता नखाते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मण झुगरे, उपाध्यक्ष-वसंत पारधी, गणपत केवारी, नरीना हिंदोळा, शिक्षक सतीश घावट, गणेश चोरघे, आनंद कराळे, संतोष कोरडे, सुनील सावळा व विद्यार्थी उपस्थित होते