- अन्यथा आम्ही पुढाकार घेऊन उभारलेले बांधकाम तोडू
- कशेळे ग्रामस्थांचा इशारा; राजकीय नेतेमंडळींचा अनधिकृत
- बांधकामाला वरदहस्त असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
कर्जत – कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राज्यमार्गालगत कशेळेगाव असून, येथून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांची, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एसटीच्या प्रतीक्षेत उभे राहणाऱ्या प्रवाशांची उन, पावसापासून संरक्षण होण्यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन आमदारांच्या निधीमधून बसथांबा उभारण्यात आला होता.
मात्र गेल्या काळात झालेल्या राज्यमार्ग रुंदीकरणात त्याचा काही भाग अडथळा ठरत असल्याने तोडण्यात आला होता. याच संधीचा फायदा घेत स्थानिक ग्रामस्थ भास्कर दिसले यांनी बसथांबा हटवून त्याठिकाणी स्वतःचे बांधकाम सुरू करून जागेवर कब्जा केल्याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली, त्याची दखल घेत संबंधित बांधकाम विभागाने दिसले. त्यांना नोटीस बजावून बांधकाम हटविण्यास लेखी कळविले, मात्र राजकीय वरदहस्तामुळे तथा राजकीय नेते मंडळींचा दबाव असल्याने प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. या विरोधात जोरदार आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून, आम्ही ग्रामस्थच मिळून हे अनधिकृत बांधकाम पाडू, असा इशारा दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या बांधकामाला तीव्र विरोध दर्शविला आहे. ऊन पावसापासून बचाव होण्यासाठी याच जागेवर येथील पूर्वीचा एसटी थांबा पूर्ववत उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. याचीच दखल घेत कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग (2) कार्यालयाने संबंधित बांधकाम करण्याऱ्या व्यक्तीला नोटीस बजावत अनधिकृत बांधकाम हटविण्यास सांगितले. परंतु राजकीय वरदहस्त असल्याने नोटीस न जुमानत बांधकाम तसेच सुरू ठेवेल आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कशेळे येथे सार्वजनिक बसथांबा तोडून बेकायदेशीर बांधकाम केल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने भास्कर दिसले आणि कशेळे ग्रामपंचायतीना लेखी व त्यानंतर वारंवार या कार्यालयामध्ये येऊन तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. केलेल्या बांधकामाबाबतचे व जागेचे दस्ताऐवज या कार्यालयास सादर करणेबाबत कळविले होते. मात्र त्यांनी याबाबत अजूनपर्यंत कोणतेही दस्ताऐवज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात सादर केलेले नाही.
तसेच आतापर्यंत लेखी अथवा तोंडी म्हणणे सुध्दा या कार्यालयाकडे सादर केलेले नाही, तसेच या जागेची मिळकत असलेले अनंता गोपीनाथ साखरे, मु. पो. कशेळे यांनी संदर्भीय त्याचे नावे असलेली विषयाकिंत जागा समाजासाठी उपयोग होईल, म्हणून सार्वजनिक बस थांबा बांधण्याकरिता या कार्यालयास समंती पत्र दिलेले आहे.
तसेच ही जागा बस थांब्यासाठी दिलेले असून, असा पोलीस ठाण्यात लेखी जबाब सुध्दा 29 जुलै रोजी दिलेला असून, याप्रकरणी आमदार महेंद्र थोरवे यांनी विषयाकिंत प्रश्न उपस्थित करून अनाधिकृत बांधकाम हटवून त्यापूर्वीप्रमाणेच ठिकाणी बसथांबा उभारण्यात यावे, असे सूचित केले आहे.
शहापूर-मुरबाड-पाटगाव-कर्जत-हाळ-खोपोली राष्ट्रीय महामार्ग 548 – हा रस्ता सद्यस्थितीत सुधारणा करण्याकरिता एमएसआरडीसी यांचेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्ग झाला आहे.
एमएसआरडीसी यांचे कडील कशेळे गावातील 200 या लांबीत एमएसआरडीसीमार्फत कुठलेही काम प्रस्तावित नाही तसेच कशेळे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातील मुख्य दोन रस्त्यांचे जक्शन असल्याने या भागातील कर्जत कार्यालयामार्फत अतिक्रमण काढणे क्रमप्राप्त आहे. तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनधिकृत बांधकाम तातडीने हटविण्याचे आदेश दिले असताना देखील अद्यापपर्यंत का हटविले गेले नाही, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
कशेळेमध्ये काही वर्षांपासून प्रवाशांसाठी बस थांबा होता. मात्र कोविड -19 मध्ये या संधी फायदा घेऊन ते बस थांबा रातोरात हटवून त्या ठिकाणी गाळे उभारण्यात आले. मात्र प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असून, त्यांच्या हक्काचे बस थांबा हिरावून घेतले आहेत. त्यामुळे प्रशासन विभागाने आठ दिवसांत बांधकाम हटविले नाही, तर आम्ही ग्रामस्थ पुढाकार घेऊन हे बांधकाम हटवू.
– स्वप्नील मते, ग्रामस्थ, कशेळे.