लोकप्रिय मोबाईल गेम अँग्री बर्डवर तीन वर्षांपुर्वी “अँग्री बर्ड’ हा सिनेमा आला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल येत असून इंग्रजीबरोबरच हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये “अँग्री बर्ड 2′ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी कॉमेडियन कपिल शर्मा आवाज देणार आहे.
कपिल शर्माची विनोदबुद्धी आणि विनोदाचे अचूक टायमिंग हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे “अँग्री बर्ड 2′ च्या हिंदी व्हर्जनसाठी कपिल शर्माला विचारण्यात आले आहे. तो या चित्रपटातील “रेड’ या कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहे. रेड हा अँग्री बर्डच्या पहिल्या सिनेमातील प्रमुख पात्र होता.
“अँग्री बर्ड 2′ च्या इंग्रजी व्हर्जनसाठी जेसन सूडिकिस या कॉमेडियनने आवाज दिला आहे. चित्रपटाच्या डबिंगसाठी कपिल खूपच उत्सुक आहे. यापूर्वी अनेक हॉलिवूड चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाले आहेत यातल्या काही चित्रपटांना बॉलिवूड कलाकारांनी आवाज दिला आहे. “डेडपूल’साठी रणवीर सिंग, “जंगलबुक’साठी नाना पाटेकर, प्रियांका चोप्रा, ओम पुरी यांनी तर नुकताच प्रदर्शित झालेल्या “दी लायन किंग’साठी शाहरूख- आर्यननं आवाज दिला आहे.