लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी?

संयुक्त बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

लोणंद – गेल्या अनेक वर्षांपासून लोणंदमधील वाहतूक कोंडीची समस्या हे नित्याचे दुखणे झालेले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी लोणंद पोलिस स्टेशनच्या मागणीवरून थर्मोप्लाष्टिक पेंटचे पट्टे आणि झेब्रा क्रॉसिंग करण्यासाठी नगरपंचायतीने 1 लाख 93 हजार रुपयांची निविदा काढली होती. तसेच लोणंद सातारा मार्गावरील लोणंद शहरातील रस्त्यावर असणारे विद्युत पोल बाजूला करण्यासाठी 16 लाख रूपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु पुढे तीन-चार वेळा संयुक्त बैठका होण्यापलीकडे आजपर्यंत कसलीच हालचाल न झाल्याने यामध्ये सुधारणा होण्याची शक्‍यता सध्या तरी दिसत नाही.

लोणंद हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पुणे, सातारा, पंढरपूर, नगर, शिरवळ मार्गे भोर, महाड, खंडाळा, अशा चहूकडे जाणारी वाहने लोणंद मार्गे जात असतात. त्यातच लोणंदच्या एमआयडीसीमुळे जड वाहनांची गर्दी वाढायला लागली आहे.

यातच भर म्हणून रस्त्यावर उभी असणारी वाहने आणि दुतर्फा झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाहतूक कोंडीत भर घालत असतात. लोणंदच्या बसस्थानक परिसरात बसस्थानकातून ये-जा करणाऱ्या बस आणि एमआयडीसीकडे जाणारी अवजड वाहने यांच्यामुळे शिरवळ चौकात वाहतूक व्यवस्था नियंत्रण करण्यासाठी पोलिस तैनात असूनही वाहतूक कोंडी होतच असते. अहिल्यादेवी चौक ते गोटेमाळ रस्त्यावर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी लोणंदकरांची डोकेदुखी ठरत आहे. यावर नगरपंचायतीने लवकरात लवकर तोडगा काढण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.

लोणंदमधे सम विषम पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर लागू करणे आवश्‍यक आहे. तसेच लोणंदच्या व्यापारी पेठांमधे रस्ता लहान असताना सुद्धा अनेक व्यापारी आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून या समस्येत भर टाकत असतात. यामुळे बाजाराच्या दिवशी तर नेहमीपेक्षा जास्त अडचण निर्माण होत असते. अशा रस्त्यावर गाड्या पार्किंग करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून अशा वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
-राजेंद्र डोईफोडे, विरोधी पक्षनेते, लोणंद नगरपंचायत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)