कामिनी एकादशीमुळे ‘आखाड’चा बेत फसला

आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी खवय्यांचा हिरमोड

पुणे – आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी कामिनी एकादशी आल्यामुळे अनेकांचा आखाड साजरा करण्याचा बेत फसला. एकादशीला अनेकांचे उपवास असल्याने, तर अनेकजण या दिवशी मांसाहार करत नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चिकन, मटण, मासळी बाजारात उलाढाल कमी झाली. रविवारी पुणेकरांनी सुमारे 400 ते 450 टन चिकन, 1 ते दीड टन मटण आणि सुमारे 15 ते 16 टन मासळी फस्त केली. रविवारी आखाड साजरा करता आला नसला तरी अजूनही मंगळवार आणि बुधवार दोन दिवस खवय्यांसाठी मिळाले आहेत.

शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षी आखाड महिन्यातील शेवटच्या रविवारी अनेकजण आखाड साजरा करीत मांसाहारावर ताव मारतात. यंदा मात्र शेवटच्या रविवारी एकादशी आल्याने चिकन, मटण, मासळी बाजारात ग्राहकांची फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे चिकन, मटण, मासळी व्यापाऱ्यांचीही निराशा झाली. सध्या पावसाचा जोर वाढला असून सलग तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे बाहेर हॉटेल, पर्यटन ठिकाणी आखाड साजरा करण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडूनही चिकन, मटण, मासळीला फारशी मागणी नव्हती. सोमवारी आणि गुरुवारी अनेकांचे उपवास असतात. त्यामुळे या दोन्ही दिवशी अनेकजण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारीच आखाड साजरा होणार असून चिकन, मटण, मासळी बाजारात उलाढाल वाढेल, असे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे आणि चिकनचे विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

गणेश पेठ मासळी बाजारात रविवारी खोलसमुद्रातील मासळीची 6 ते 7 टन, खाडीची 300 ते 400 किलो तर नदीच्या मासळीची 1 ते दीड टन आणि आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळू 10 ते 12 टन इतकी आवक झाली. आखाडा महिन्याचा बुधवारी शेवट असल्याने मागणी वाढून उलाढाल वाढेल.
– ठाकूर परदेशी, मासळीचे व्यापारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)