भोपाळ – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या प्रचारासाठी जे कष्ट घेतले आहेत ते कौतुकास्पद आहेत. त्यांच्या तेथील प्रयत्नांमुळे उत्तरप्रदेशात निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक लागतील असे भाकित ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी केले आहे.
ते म्हणाले की प्रियाकांची “लडकी हुँ लड सकती हुँ” ही मोहीम सर्व जाती धर्मातील महिलांसाठी एक नवीन आशा निर्माण करणारी ठरली आहे. त्यामुळे त्याचा कॉंग्रेसच्या मतांवर लक्षणीय विधायक परिणाम होईल आणि निवडणुकांचे जे निकाल लागतील ते आश्चर्यकारक असतील असे त्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की मी उत्तरप्रदेशच्या राजकारणाशी खुप जुन्या काळापासून संबंधीत आहे. युवक कॉंग्रेसचे काम करतानाही मी तेथे काम केले आहे. अलिकडेच मी त्या राज्याला भेट दिली. त्यावेळी तेथील प्रियंका गांधी यांनी घडवलेला बदल मी अनुभवला आहे.
ते म्हणाले की भाजपने मोठी जाहींरातबाजी केली असली तरी त्याचा फार काही परिणाम होणार नाही. केवळ तेवढ्या आधारावर भाजप जिंकू शकत नाही. 95 टक्के जनता आज सोशल मिडीयाशी संबंधीत आहे आणि त्यांना सर्व बाबींची चांगली माहिती आहे. जनता भाजपच्या विरोधातच कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला