पणजी – पाच राज्यांमधील निवडणुका जाहीर झाल्यानंतर कॉंग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. आधीच राजकीय वातावरण तापलेले असल्यामुळे अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची तारेवरची कसरत गोव्यात पाहायला मिळते आहे. त्यात कॉंग्रेसने आता आपल्या उमेदवारांची दुसरी यादीदेखील जारी केली आहे.
दुसऱ्या यादीत कॉंग्रेसने सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसऱ्या यादीत कॉंग्रेसकडून जितेंद्र गावकर (पेडणे), रुडॉल्फ लुईस फर्नांडिस (सांताक्रूज), राजेश फळदेसाई (कुंभारजुवा), मनिषा शेणवी उसगावकर (वाळपई), कॅप्टन विरीएटो फर्नांडिस (दाभोळी), ऑलेन्सिओ सिमन्स (कडतरी) आणि आवरतो फुर्तादो (नावेली) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसच्या यादीपूर्वी आज आपचीही दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. तसेच गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून गोव्यातील सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसाद गावकर हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी आपल्या आमदारीकचा राजीनामा देऊन आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.