चेन्नई – मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यास अनुकूलता दर्शवली आहे. निमंत्रण आल्यास परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
भाजपविरोधात एकवटण्याच्या जोरदार हालचाली विरोधी पक्षांनी सुरू केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर, विरोधकांच्या आघाडीत सहभागी होणार का, असा प्रश्न कोईम्बतूर येथे पत्रकारांनी हासन यांना विचारला. त्यावर त्यांनी विरोधकांकडून प्रस्ताव आल्यास विचार करण्याचे संकेत दिले.
पेगॅसस पाळत प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने संसदेत गदारोळ होऊन कामकाज ठप्प होत आहे. त्याबाबत विचारल्यावर हासन उत्तरले, संसदेत जे काही घडत आहे; ते प्रतिक्रियेचेच स्वरूप आहे. कुणी इतरांच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावू नये. सरकारने पाळत ठेवणारे बनू नये, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
नुकत्याच झालेल्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हासन यांच्या पक्षाने सर्व ताकद पणाला लावली. मात्र, त्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे राजकीय प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या हासन यांच्या पक्षापर्यंत विरोधक पोहचणार का, हाही औत्सुक्याचा विषय असेल.