पुसेगाव – पुसेगाव, ता. खटाव येथे सुरू असलेल्या सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त आयोजित जनावरांच्या प्रदर्शनात गोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल पवार यांच्या सहा दाती बैलाला काजळी खिलार बैल गटात चॅम्पियन किताब देण्यात आला.
देखण्या खिलार जातीच्या जनावरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्ररासह “कर्नाटकातून ४१६ जातिवंत जनावरांची नोंद झाली. येथील सातारा-पंढरपूर रोडवरील यात्रा स्थळावर झालेल्या प्रदर्शनाला खिलारप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. या प्रदर्शनात सां गादेगाव (ता. पंढरपूर) येथील मारुती मस्के यांच्या चार दाती गायीने काजळी खिलार गाय गटात चॅम्पियन किताब मिळविला. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील रणजित खपाळे यांच्या जुळीक बैलाला खिलार कोसा बैल गटात चॅम्पियन किताब देण्यात आला, तर परिती (ता. माढा) येथील ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासहा दाती गायीने खिलार कोसा गाय गटात चॅम्पियन किताब मिळविला.
चॅम्पियन जनावरांच्या मालकाला २५ हजार रुपये व श्री सेवागिरी चषक देऊन सन्मानित करण्यात आले. खिलारच्या उपजातीनुसार खिलार काजळी बैल, खिलार काजळी गाय, खिलार कोसा बैल, खिलार कोसा गाय अशा विविध जातिवंत जनावरांचा प्रदर्शनात समावेश होता. प्रत्येक गटात जुळीक, सहा दाती, चार दाती, दोन दाती, आदत (वर्षावरील), आदत (वर्षाखालील) अशा वयोमानानुसार सहा उपगटांत निवड स्पर्धा झाली.
प्रत्येक उपगटात निवड झालेल्या प्रथम चार विजेत्या जनावरांच्या मालकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली. जिल्हा व राज्याबाहेरून आलेल्या शेतकऱ्यांना ट्रस्टकडून मदत देण्यात आली.
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जातिवंत खिलार जनावरे प्रदर्शनात सहभागी झाली होती. प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातीलखिलारप्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात आली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार महेश शिंदे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला.