सांगली : कडकनाथ कोंबडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. गणेश शेवाळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. मात्र, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते याला पकडण्यात अपयश आले असून तो अद्याप फरार आहे.
कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूक केलेल्या हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महारयत ऍग्रो कंपनीचा संस्थापक सुधीर मोहिते, संचालक संदीप मोहिते, गणेश शेवाळे, विनय शेंडे, हणमंत जगदाळे या पाच जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी संदीप मोहिते, हणमंत जगदाळे यांना आधीच अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गणेश शेवाळेला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते, विनय शेंडे अजूनही फरार आहे. सुधीर मोहितेचा अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या फसवणूक प्रकरणी आत्तापर्यंत 1100 जणांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.