पंचायत इमारतीसमोर घाण केल्यामुळे मारहाण
शिवपुरी (मध्यप्रदेश) : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात दोन दलित मुलांना अन्य दोन जणांनी मारहाण केली. त्यामध्ये या दलित मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पंचायत इमारतीच्या समोरील रस्त्यावर शौच केल्याबद्दल या मुलांना बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवपुरी जिल्ह्यातील भावकेठी गावात सकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. या मारहाणीमध्ये रोशनी बाल्मीकी (वय 12) आणि अविनाश बाल्मीकी (वय 10) या दोन मुलांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, ेत्थे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हाकिम यादव आणि त्याचा भाऊ रामेश्वर यादव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सिरसोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. एस. धाकड यांनी सांगितले. आतापर्यंतच्या तपासात केवळ दोन आरोपी असल्याचे आढळले आहे, असे ते म्हणाले. आपल्या जातीबद्दल भेदभाव होत असल्याचा आरोप मयत दोन मुलांपैकी एका मुलाच्या वडिलांनी केला. इतरांनी पाणी घेतल्यावरच त्यांना गावच्या हॅंडपंपमधून पाणी काढण्याची परवानगी असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, जिल्हा मुख्यालयापासून 25 कि.मी. अंतरावरच्या भावकेठी गावात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.