मुंबई – ज्येष्ठ कबड्डी संघटक तसेच मुंबई शहर कबड्डी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य व अध्यक्ष मारुती जाधव यांचे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू सुनील आणि रामचंद्र ही दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
दोन दिवसांपूर्वी जाधव यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ते उपचारांना फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यातच त्यांचे निधन झाले. राज्यात करोनाचा धोका पुन्हा वाढत असल्याने अत्यंत निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. जाधव हे मूळचे कोल्हापूरचे.
नोकरीनिमित्त ते मुंबईत स्थायिक झाले. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या कार्यकारी सदस्यपदीदेखील ते बरीच वर्षे कार्यरत होते. चार दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई कबड्डी संघटनेत कार्यरत असणाऱ्या जाधव यांनी संयुक्त कार्यवाह, प्रमुख कार्यवाह, उपाध्यक्ष आदी विविध पदे सांभाळली. त्यानंतर त्यांना तहहयात अध्यक्षपद देण्यात आले. राज्याच्या कबड्डी क्षेत्रात मास्तर या नावाने ते परिचित होते.