बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बंगळुरू हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. राज्यात सत्तांतर नाट्य घडवणाऱ्या ऑपरेशन लोटस प्रकरणाची चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यासाठी 2019मध्ये भाजप नेते येडियुरप्पा यांनी ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून षडयंत्र रचल्याचा येडियुरप्पा यांच्यावर आरोप आहे.
त्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. वडिलांना राजीनामा द्यायला सांग किंवा पक्ष सोडायला सांग असे येडियुरप्पा एका आमदाराच्या मुलाला सांगत असल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
2019मध्ये आमचे सरकार पाडण्यासाठी भाजपने षडयंत्र रचले होते, असा दावा कॉंग्रेस आणि जेडीएसने केला होता. त्याप्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणीही या दोन्ही पक्षांनी केली होती. 2018मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेस-जेडीएसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती.
त्यानंतर 2019मध्ये सत्ताधारी आघाडीतील काही आमदार भाजपला येऊन मिळाले होते. त्यामुळे राज्यात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यात आले होते.