भोपाळ – मध्यप्रदेशातल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 18 वर्ष कॉंग्रेसमधे राहिल्यावर आता पुढील मार्ग निवडण्याची वेळ आली आहे, असं सिंदीया यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी शिंदे यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कॉंग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून निलंबित केले आहे.
मध्यप्रदेशात सत्ताधारी कॉंग्रेसच्या किमान 17 आमदारांचा संपर्क तुटल्याने राज्यातले कॉंग्रेस सरकार पेचप्रसंगात अडकले आहे. बेपत्ता झालेल्या आमदारांमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश असून, ते सर्वजण ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आहेत. 230 सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत कॉंग्रेसचे 114 आमदार आणि विरोधी भाजपचे 107 सदस्य आहेत.
चार अपक्ष, बसपाचे दोन आणि समाजवादी पक्षाच्या एका आमदारांने कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता.
दरम्यान, कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आज आपापल्या आमदारांची बैठक बोलवली आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्प अधिवेशन येत्या 16 तारखेला सुरू होणार आहे, तर राज्यसभेसाठीही मध्यप्रदेशातून तीन जागा निवडून द्यायच्या आहेत.