कॅनडातील निवडणुकीत जस्टीन ट्रुडो पद राखणार का?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रुडोंच्या पाठिशी

व्हॅनकूव्हर – कॅनडामध्ये सोमवार दि. 21 ऑक्‍टोबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने सर्वच संभाव्य उमेदवारांचा मोठया प्रमाणावर प्रचार सुरू आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या निवडणूक प्रचारात व्यग्र असून त्यांच्या समर्थनार्थ आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा सरसावले आहेत. ओबामांनी कॅनडाच्या नागरिकांना ट्रुडो यांना आणखीन एक संधी देण्याचे आवाहन करत त्यांना विकासशील विचारसरणीचा नेता आणि चांगले मित्र संबोधिले आहे.

ट्रुडो यांच्या समर्थनार्थ ओबामांनी ट्‌विट केले आहे. आपन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ट्रुडो यांच्यासोबत काम केल्याचा मला अभिमान आहे. ते अत्यंत कष्टाळू आणि प्रभावी नेते आहेत. हवामान बदल यासारख्या मोठया मुद्दयांवर ते काम करत आहेत. जगाला त्यांच्या विकासशील नेतृत्वाची सध्या गरज असून उत्तरेकडील माझे शेजारी त्यांना निश्‍चितपणे दुसरी संधी देतील अशी अपेक्षा करत आहेत, असे ओबामांनी म्हटले आहे.

जस्टिन ट्रुडो आणि ओबामा यांच्या मैत्रीने काही वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळविली होती. ओबामा यांनी अध्यक्ष म्हणून कॅनडाच्या दौऱ्यादरम्यान ट्रुडो यांना चांगला मित्र संबोधून सभागृहात ब्रोमांस (भावांसारख्या मैत्रीसाठी प्रचलित शब्द) पाहायला मिळेल असे म्हटले होते. ट्रुडो यांनी ओबामांना अनेकदा मेहनती आणि संघर्षाचा नायक ठरविले आहे.

पंतप्रधान ट्रुडो यांनी मागील महिन्यातच संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लिबरल पार्टीचे नेते ट्रुडो यांनी प्रचारास प्रारंभ केला आहे. या निवडणुकीतील मुख्य लढत लिबरल आणि कॉन्झर्व्हेटिव पार्टीदरम्यानच होणार आहे. 2015 मत्ये स्टीफन हार्पर यांना पराभूत करत ट्रुडो यांनी विजय मिळविला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.