ग्रामीण भागात 31 ते 40 वयोगटातील 25 टक्के बाधित
पुणे – शहरासह ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीतही करोनाचा संसर्ग फोफावला आहे. त्यामध्ये वयवर्षे 31 ते 40 या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक 25 टक्के इतके आहे. तर 21 ते 30 या वयोगटातील बाधित सापडण्याचे प्रमाण 21.3 टक्के इतके आहे. दरम्यान, एकूण बाधितांच्या तुलनेत 75 हजार 901 बाधित हे पुरूष तर 40 हजार 280 बाधित महिला आहेत. म्हणजे पुरूषांचे बाधित प्रमाण 65 टक्के इतके आहे.
पुन्हा लॉकडाऊन झाले तर काय? हा मोठा प्रश्न नोकरदारवर्ग आणि हातावर पोट असलेल्यांसमोर आहे. त्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी तरुण बाहेर पडताना दिसत आहे. त्यामध्ये काही अपवादात्मक व्यक्ती मौज-मजेसाठीही बाहेर फिरत असतात.
दरम्यान, आतापर्यंत ग्रामीण आणि नगरपालिका हद्दीत जवळपास 1 लाख 16 हजार बाधित संख्या आहे. त्यामध्ये 21 ते 60 या वयोगटातील 74 टक्के बाधित आहेत. सर्वाधिक बाधित सापडण्याचे प्रमाण 31 ते 40 वयोगटातील आहेत.