मुंबई – अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असतानाच सचिन वाझे यांच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयात ९० टक्के ब्लॉकेजेस असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. सचिन वाझेंच्या वकिलांनी विशेष न्यायालयात ही माहिती सांगितली आहे.
सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 90 टक्के रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस आहेत. वाझे यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सचिन वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी त्यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
मागील आठवड्यातही सचिन वाझे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालया तदाखल करण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री १.३०च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आल्याची माहिती आहे. याआधीही दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती.
दरम्यान, अटकेत असलेले सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत आहेत. यामुळेच आज ही मुदत संपणार असून विशेष न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी बळीचा बकरा ठरतोय – सचिन वाझे
मला बळीचा बकरा बनवले जात आहे, असा दावा सचिन वाझे यांच्याकडून एनआयए न्यायालयात करण्यात आला होता. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितले की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत. आम्ही तुला अटक करत आहे. जी चौकशी करायची होती ती करून झाली, आता आणखीन एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती सचिन वाझे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली होती. तसेच मला न्यायालयाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावर तुम्हाला जे काही सांगायचे ते लेखी लिहून द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.