ज्योतिषशास्त्रामधील बारा ग्रहांपैकी गुरु आकाराने सर्वात मोठा व अतिशुभ असा ग्रह होय. असा हा गुरु सामान्यतः एका राशीत एक वर्ष राहतो. सर्व ग्रहांमध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्व आहे. प्रत्येक शुभ कार्यात गुरुबळ आहे की नाही ते पाहिले जाते. कोणतेही शुभ कार्य उदा. विवाह, उपनयन
इ. गुरुबलाशिवाय करीत नाहीत. गुरु हा कुंडलीतील पंचम, नवम व दशम स्थानांचा मालक असल्याने शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, नशीबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, शालिनता, नम्रता तसेच व्यक्तीचे कर्म, सामाजिक पतप्रतिष्ठा, मानसन्मान, किर्ती, पैसा व व्यक्तीचे सुख, ऐश्वर्य, यश, नीतीमत्ता, तत्वज्ञान, धार्मिकता इत्यादीचा कारक ग्रह आहे.
गुरु हा पुरुष ग्रह असून स्वभावाने तो मृदू, शांत, सात्विक, धार्मिक, सदाचारी, नीतीमान, न्यायी, कायद्याचे पालन करणारा, तत्ववक्ता, आशावादी, दयाळू, परोपकारी, क्षमाशील, सद्गुणी
आहे. गुरुचा शरीस्थ चरबी (मेद) या धातूवर अंमल असून गुरुमुळे यकृताचे विकार, काविळ, हृदयाची अनियमित धडधड, रक्तवाहिन्यातील बिघाड, चरबीच्या गाठी, स्थौल्य, मधुमेह, कॅन्सर आदी रोग होतात.
गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, न्यायाधीश, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार आदी लोक येतात. गुरुचे चंद्र, रवी, मंगळ हे मित्रग्रह, शुक्र, बुध हे शत्रू ग्रह व शनि, राहू, केतू हे समग्रह असून कर्कराशीत उच्चीचा
तर शनिच्या मकर राशीत नीचीचा होतो. त्यामुळे गुरु गोचरीने कर्क, धनु, मीन, सिंह, मेष, वृश्चिक या राशीतून जातो त्यावेळी तो शुभफलदायी तर वृषभ, तुला, मिथुन, कन्या, मकर या राशीतून जातो त्यावेळी तो अशुभ फलदायी ठरतो.
असा हा गुरु कार्तिक शुक्ल 8 मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे 5.18 मिनिटांनी वृश्चिक राशीतून आपल्या स्वराशीत व मूळ त्रिकोण राशीत म्हणजे धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर हा गुरु 29 मार्च 2020 रोजी मकर राशीत प्रवेश (काही काळ) करणार आहे. त्यानंतर 29 जून रोजी पुन्हा गुरु धनु राशीमध्ये वक्री होणार आहे. हा वक्री गुरु 13 सप्टेंबर 2020 नंतर मार्गी होवून पुढे 20 नोव्हेंबर
2020 रोजी मकर या आपल्या नीच राशीत प्रवेश करणार आहे. धनु राशीमधील गुरु अनुक्रमे मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा नक्षत्रातून जाणार आहे. गुरु हा बुध, शुक्र, चंद्र व स्वतःच्या नक्षत्रातून जातो त्यावेळी शुभ फळे देतो. त्यामुळे पूर्वाषाढा या शुक्राच्या नक्षत्रातून होणारे गुरुचे भ्रमण दि. 4/1/2020 ते 7 मार्च 2020 पर्यंत उत्तम शुभ फलदायी जाईल. तर मूळ व उत्तराषाढा नक्षत्रातील भ्रमण प्रतिकूल जाईल असे दिसते.
हा धनु राशीमधील गुरु सामान्यपणे खालीलप्रमाणे फळे देईल असे मला वाटते. हा गुरु धनधान्यवृद्धी करेल, सोन्याचे दर वाढवेल, दूध मिठाईजन्य पदार्थ यांच्या किंमती वाढवेल. या गुरुमुळे यावर्षी थंडीचे प्रमाण खूप वाढेल. त्यामुळे साथीजन्य रोग कमी राहतील. एकंदरीत आरोग्यास उत्तम राहील. किर्तनकार, साधुसंत, महंत, पुरोहित, ज्योतिषी यांना विशेष सवलतीचा, पेन्शनचा किंवा आर्थिक मदतीचा लाभ होईल.
संस्थापक, विविध संस्था किंवा कॉलेज, विद्यापीठ यांच्या अडचणी कमी होतील. त्यांना कर्ज उपलब्ध होतील व नवनवीन कोर्सेज्ञ पुन्हा सुरू होतील. देशाची आर्थिक स्थिती सुधारेल. जागतिक स्तरावरील आर्थिक मंदी दूर होईल. मोठे आर्थिक निर्णय घेतले जातील. बाहेरच्या देशातून किंवा शेजारील राष्ट्राकडून पैसा उपलब्ध केला जाईल. थोडक्यात 2020 साल सर्वांसाठी सुखसमृद्धीचे, लाभाचे व आनंदाचे जाणार हे निश्चित. नवीन सरकारकडून मोठमोठ्या योजनांची खैरात केली जाईल असे दिसते.
प्रा. डॉ. विकास खिलारे, सातारा.