इयत्ता ११ वीच्या पुस्तकात समावेश
जुन्नर – जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट, मढ परिसरात येणारे फ्लेमिंगो पक्षी, मानमोडीच्या डोंगरावरील बौद्धकालीन लेण्या, हटकेश्वरचा नैसर्गिक पूल, लेण्याद्री डोंगरावरील स्तूप व लेण्या, जीवधन किल्ल्याजवळील वानरलिंगी सुळका आदी स्थळांच्या सचित्र माहितीचा तेलगू भाषिक पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
या अकरावीच्या पुस्तकात समावेश करण्यात आलेल्या माहितीसाठी तेथील शिक्षण मंडळाने निवृत्त सैनिक रमेश खरमाळे यांच्याशी चर्चा केली होती. खरमाळे यांचे जुन्नर व परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती देणारे सोशल मीडीयावरील पेज पाहून त्यांना याबाबतीत संपर्क करण्यात आला होता. जुन्नर वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या खरमाळे आपल्या निसर्गरम्य जुन्नर तालुका या पेजच्या माध्यमातून तालुक्यातील माहिती राज्यातील पर्यटकांना देत असतात.
या पेजला सुमारे 70 हजार फॉलोवर्स असून तालुक्यातील विविध स्थळांची माहिती, तेथील अंतर, तेथील वैशिष्टे तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी आदी माहिती फोटोसह या पेजवर प्रकाशित केली जात असते. वनसंरक्षक जयरामे गौडा, वनपरिक्षेत्र अधीकारी अजित शिंदे, रोटरीचे अध्यक्ष धनंजय राजूरकर यांनी खरमाळे यांचे अभिनंदन केले
आहे. तसेच तालुक्यातील विविधस्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.