अवयव दानातून एकाला दृष्टी तर दुसऱ्याला जीवनदान
पिंपरी – आयुष्यभर इतरांना सतत मदत करणारे भोसरीतील बाळासाहेब लांडगे हे मृत्यूनंतरही इतरांच्या कामी आले. त्यांच्या नेत्रदानातून एकाला दृष्टी तर किडनी दानातून दुसऱ्याला जीवनदान मिळाले.
बाळू ऊर्फ बाळासाहेब लांडगे (वय 56, रा. गुळवे वस्ती, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लांडगे हे पीएमपीमध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून कामाला होते. नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता ते भोसरी येथील पीएमपीच्या बीआरटी बस थांब्यावर कामाला निघाले होते. सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.
सकाळी नऊ वाजताच्या सुमारास कुटूंबियांना माहिती मिळाली. यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र लांडगे हे बुशुद्ध अवस्थेत होते. रूग्णालयाकडून केल्या जाणाऱ्या उपचारास त्याचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र मोठ्या रुग्णालयात नेल्यावर चांगले उपचार मिळतील, असे वाटल्याने त्यांच्या कुटूंबियांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगत त्यांच्यावर उपचार करून उपयोग होणार नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब लांडगे यांचे नेत्रदोन केल्यास एका व्यक्तीस कायमची दृष्टी मिळू शकते तर किडनी दान केल्यास दुसऱ्या व्यक्तीस जीवनदान मिळू शकते, असे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. मात्र याबाबत कसा निर्णय घ्यायचा, असा प्रश्न लांडगे कुटूंबियांसमोर निर्माण झाला. त्यांचा मोठा मुलगा सचिन, लहान मुलगा सागर, बहिण रेखा आंग्रे आणि राजश्री काळोखे यांची याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी आई मंदा यांनी याबाबत निर्णय घेतला. ते आयुष्यभर इतरांच्या कामी आले आहेत. त्यांच्या मृत्यूनंतरही ते इतरांच्या कामी येणार असतील तर अवयवदानाचा निर्णय घ्या, असे सांगितले. सर्व कुटूंबियांची संमती मिळाल्यानंतर बाळासाहेब लांडगे यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 6 नोव्हेंबर रोजी त्यांचे अवयव दान करण्यात आले. अवयवदानातून लांडगे कुटूंबियांनी इतरांसमोर एक आदर्श निर्माण केल्याची चर्चा सध्या भोसरीत सुरू आहे.
अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा
दरम्यान बाळासाहेब लांडगे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांचा मुलगा सागर लांडगे (वय 29) यांनी शनिवारी (दि. 9) भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 9) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलवाडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.