जुन्नर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसला रोखण्यासाठी केलेल्या जनता कर्फ्यू आवाहनाला जुन्नर शहरात व परिसरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी (दि. 22) सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते.
पहाटे वरसुबाई देवी व किल्ले शिवनेरी परिसरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनीही आज सुट्टी घेतल्याचे दिसत होते. नेहरु बाजार, सराई पेठ व रविवार पेठ, व्यापारीपेठांसह मुख्य बसस्थानक, किल्ले शिवनेरी परिसर, मार्केट यार्ड, लेण्याद्री देवस्थान परिसर आदी गर्दीच्या ठिकाणे निर्मनुष्य झाली होती. तालुक्याच्या पश्चिम भागांतील येणेरे, वडज, कुसुर, आपटाळे, मढ आदी गावांमध्ये ग्रामस्थांनी जनता कर्फ्युच्या आवाहनाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतात न जाता घरीच राहणे पसंत केले. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी स्टे टू होम, करोना हरणार, भारत जिंकणार, करोन्या, रविवारी मी घरीच थांबणार आहे, आदी स्टेटस् व प्रोफाइल नेटकऱ्यांनी आधीच अपडेट केले होते. याचा सकारात्मक परिणाम दिसत होता.