जुन्नर – जुन्नर पंचायत समितीच्या एका विभागातील अधिकाऱ्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे अधिकारी गेल्या आठवड्यात पुणे येथे गेले होते. त्यांना लक्षणे दिसू लागल्यावर रुग्णालयात दाखल केले होते.
गुरुवारी (दि.9) त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीत अतिदक्षता बाळगत कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. गुरुवारी नागरिकांशी संपर्क साधताना अधिकारी खिडकीतून संपर्क साधताना दिसत होते.
दरम्यान, पुढील काही दिवसांसाठी नागरिकांनी कार्यालयात येणे टाळावे तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतीत किंवा ग्रामसेवकाकडे जमा करावीत, असे आवाहन सभापती विशाल तांबे यांनी केले आहे.