बर्मिंगहॅम, दि. 3 -भारताची अनुभवी महिला ज्युदोपटू तुलिका मान हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 78 किलो वजनी गटात रजतपदक पटकावले. बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत तिला स्कॉटलंडच्या साराह अडलिंग्टनकडून पराभव पत्करावा लागल्याने सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.
तुलिकाला अडलिंग्टनने इप्पॉनमध्ये सहज नमवताना सुवर्णदकाला गवसणी घातली. यंदाच्या स्पर्धेत सुशीलादेवीनंतर रजत पटकावणारी तुलिका भारताची दुसरीच ज्युदोपटू ठरली. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात पिछाडीवरून अफलातून कामगिरी करताना न्यूझीलंडच्या सॅडनी ऍण्ड्रयूजचा इप्पॉन डावाच्या जोरावर पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
या कामगिरीसह तिने आपले पदकही निश्चित केले होते.
या खेळात यंदाच्या स्पर्धेत
आतापर्यंत एल. सुशिलादेवी व विजयकुमार यांनी पदके मिळवली आहेत. याच खेळात पुरुषांच्या 100 किलो वजनी गटात दीपक देसवालला पराभवाचा सामना करावा लागला.