नवी दिल्ली : भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा 20 जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार घेऊ शकतात. अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या असल्यामुळे पुढील अध्यक्ष म्हणून जे.पी.नड्डा पदभार स्वीकारू शकतात.
नवीन अध्यक्ष्य पदासाठी भाजपने जोरदार तयारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजप नड्डा यांच्यासाठी भव्य समारंभ आयोजित करणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर नड्डा यांच्याकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आले होते. जून 2019 मध्ये अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले.
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानुसार दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजप मुख्यालयात नड्डा यांच्या समारंभासाठी जोरदार तयारी सुरु आहे. सरकारमधील सर्व मंत्री 20 जानेवारीला पक्ष मुख्यालयात हजर राहतील. या समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, याबरोबरच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कार्यकर्ते उपस्थित राहतील.