मुंबई : – एखदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरीमुळे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, बटलरने या वृत्ताचे खंडन केले असून वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज होणार असल्याचे बटलरने म्हटले आहे.
यंदाच्या स्पर्धेत इंग्लंडचा संघ सातत्याने पराभूत होत आहे. त्यातच संघातील एकाही फलंदाजने दर्जानुसार कामगिरी केली नाही. त्यांनी 2019 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, यंदा त्यांना गतविजेते असूनही या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे आता बटलर नेतृत्व सोडणार अशी चर्चा होत होती. मात्र, बटलरने हे वृत्त पेटाळले आहे.
2019 साली इंग्लंडने ही स्पर्धा जिंकत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेत त्यांना सपशेल अपयश आले आहे. इंग्लंड संघाने विश्वचषकातील आठव्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण झाले आहेत. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी याआधीच त्याचे विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे.