दुबई – पाकिस्तान विरुद्धच्या 2022 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या विराट कोहलीने जो अफलातून षटकार फटकावला होता त्याचा सन्मान आयसीसीने केला आहे. हा षटकार शतकातील सर्वोत्तम षटकार असा गौरव कोहलीच्या या षटकाराचा करण्यात आला आहे.
आयसीसीने कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याला हे भन्नाट बक्षीस दिले आहे. कोहलीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कारकिर्दीतील 49 वे शतक फटकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र, त्यापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध एक अविश्वसनीय षटकार फटकावला होता, त्याचाच गौरव करत आयसीसीने हा षटकार शॉट ऑफ द सेंच्युरी घोषित केला आहे. आयसीसीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोहलीच्या या षटकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्यात भारताला विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज होती. कोहली खेळपट्टीवर तसेच स्ट्राईकवर असल्यामुळे भारतीय संघांच्या विजयाच्या आशा कायम होत्या. पाकिस्तानचा भरात असलेला वेगवान गोलंदाज हॅरीस रौफ 19 व्या षटकाचे शेवटचे दोन चेंडू टाकण्यासाठी तयार होता. याच षटकात कोहलीने रौफला दोन षटकार फटकावले होते. त्यातीलच एक षटकार आयसीसीने शॉट ऑफ द सेंच्युरी म्हणून घोषित केला आहे.
विक्रमाची प्रतीक्षा
यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. त्यापूर्वी भारताचा येत्या रविवारी नेदरलॅंड्सशी एक अखेरचा साखळी सामना होणार आहे. म्हणजेच भारतीय संघ दोन सामने खेळणार असून अंतिम फेरीतही स्थान मिळाले तर एक सामना जास्त खेळायला मिळणार आहे. म्हणजेच सचिनची कामगिरी मागे टाकत 50 षटकांचा विक्रम साकारण्याची कोहलीला संधी आहे.