बटलर, स्टोक्‍सचे पुनरागमन; भारताविरुद्धच्या कसोटींसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

लंडन – भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सतरा सदस्यीय संघात यष्टीरक्षक जॉस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्‍स यांचे पुनरागमन झाले आहे. हे दोघे मागील महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत खेळले नव्हते.

या संघामध्ये सॅम करन आणि जॉनी बेअरस्टोचीही निवड करण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅम येथे, तर दुसरा सामना 12 ऑगस्टपासून लॉर्डस येथे खेळला जाईल. त्याआधी एक आठवडा म्हणजेच 28 जुलैला इंग्लंडचे खेळाडू एकत्र येणार असल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) देण्यात आली आहे.

पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनचाही इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. रॉबिन्सनला मागील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याने या सामन्याच्या दोन डावांत मिळून 7 विकेट घेतल्या आणि फलंदाजीत 42 धावा केल्या होत्या.

परंतु, रॉबिन्सनने कसोटीत पदार्पण केल्यानंतर त्याचे 2012-13 मधील काही वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विट समोर आले. त्यामुळे त्याच्यावर आठ सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यापैकी पाच सामन्यांची शिक्षा रद्द करण्यात आली, तर या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच तो तीन सामन्यांना मुकला. त्यामुळे आता भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करु शकणार आहे.

वेगवान गोलंदाज क्रिस वोक्‍स आणि जोफ्रा आर्चर अजून पूर्णपणे फिट नसल्याने त्यांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडच्या संघात स्थान मिळालेले नाही. वोक्‍सच्या पायाला, तर आर्चरच्या हाताला दुखापत झाली होती. वोक्‍स त्यानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे. परंतु, तो कसोटी सामना खेळण्याइतपत फिट झालेला नाही.

असा असेल इंग्लंडचा संघ:
जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॉस बटलर, झॅक क्रॉली, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, डॉम सिबले, बेन स्टोक्‍स, मार्क वूड.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.