सीएए, एनआरसीचा हिंदु-मुस्लिम भेदभावाशी संबंध नाही

गुवाहाटी – सीएए म्हणजेच नागरीकता दुरुस्ती कायदा आणि एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स यांचा देशातील हिंदु-मुस्लिम भेदभावाशी काहीही संबंध नाही. या प्रकरणात धार्मिक स्वरूपाचे राजकारण काहींनी आणले आहे पण यात त्यांचा केवळ राजकीय लाभ घेण्याचाच इरादा आहे असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

नागरीकत्व कायद्यामुळे कोणत्याही मुस्लिमाचे काहीही नुकसान होणार नाही असेही भागवत यांनी स्पष्ट केले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांची काळजी घेण्याचे आश्‍वासन दिले होते. आणि ते आजवर पाळले गेले आहे.

आम्हीही हे तत्त्व पाळू, सीएएमुळे कोणत्याही मुस्लिमाचे नुकसान होणार नाही याचीही आम्ही काळजी घेऊ असे भागवत यांनी म्हटले आहे. सीएए आणि एनआरसीवरील एका पुस्तकाचे भागवत यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की नागरीकत्व कायद्यामुळे शेजारील देशांमध्ये पोळल्या गेलेल्या अल्पसंख्याकांचे भारतात संरक्षण होईल.

या शेजारच्या देशातील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी तेथील बहुसंख्याकांच्या मदतीसाठीही आम्ही धावलो आहोत. या देशातील ज्या अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटते आहे किंवा त्यांना तेथे केवळ धर्माच्या आधारावर धमकावले जात आहेत त्यांना जर भारतात यावेसे वाटत असेल तर आपल्याला त्यांना मदत करावीच लागेल असे ते म्हणाले.

एनआरसीच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की आपल्या देशात राहणारे नागरिक नेमके कोणत्या देशाचे आहेत हे जाणून घेण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे. हा विषय आता राजकीय नेतृत्वाच्या हातात गेला असून सरकारलाच त्या विषयी भूमिका घ्यावी लागेल असे ते म्हणाले. काही जण या दोन विषयांवरून नाहक राजकारण करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.