मुंबई : मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. चर्चगेट इथल्या एमसीए लाऊन्जमध्ये रात्री साडेसात वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती या बैठकीचे संयोजक आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आघाडीने म्हणजेच इंडियाहीदेखील बैठक लवकरच पार पडणार आहे. विरोधकांची तिसरी बैठक पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीमुळे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची संयुक्त बैठक महत्त्वाची समजली जात आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार आणि आमदार भाजपसोबत गेले आहेत. मात्र, शरद पवार मविआसोबत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यांच्या उपस्थितीवर ठाकरे गटाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली होती. परंतु शरद पवार या कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे शरद पवारांच्या या भूमिकेनंतर आता महाविकास आघाडीच्या बैठकीत कोणती भूमिका घेण्यात येणार हे पाहणे गरजेचे आहे.
दुसरीकडे शरद पवार यांनी 5 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीद्वारे शरद पवार मविआ नेत्यांची नाराजी दूर करतील, असे म्हटले जात आहे. 5 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मुंबईच्या नेहरु सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीत विरोधकांची आघाडी इंडिया महाविकास आघाडीच्या आगामी रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.