सातारा – बॅंकेत नोकरी लावतो, असे सांगून करंडी (ता. सातारा) येथील एका तरूणाला साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी विलास किसन जाधव (वय 56, रा. करंडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशाल यशवंत पिलावरे (वय 40, रा. काळाराम मंदिरासमोर जंगीवाडा, मंगळवार पेठ, सातारा), प्रसाद विष्णूपंत धोत्रे (वय 55, रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), गायकवाड (पूर्ण नाव नाही) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विलास जाधव सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहित याच्या नोकरीसाठी जाधव प्रयत्न करत होते. त्यांच्या गावातील दादा पिलावरे यांचा पुतण्या विशाल पिलावरे त्यांच्या ओळखीचा होता. त्याने एका बॅंकेत तुमच्या मुलाला नोकरीला लावतो, माझ्याकडे तशी पार्टी आहे, असे सांगितले. त्यामुळे जाधव यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पैशाची तजवीज केली. विशाल पिलावरेने विलास जाधव यांना गाडीतून मोळाचा ओढा येथे राहत असलेल्या प्रसाद धोत्रे याच्याकडे नेले. “धोत्रेसाहेब मंत्रालयात कामाला असतात. त्यांची ओळख आहे, यापूर्वी त्यांनी चार ते पाच जणांची कामे केली आहेत,’ असे पिलावरेने त्यांना सांगितले. त्यामुळे विलास जाधव यांनी त्यांना साडेपाच लाख रुपये दिले.
पैसे दिल्यानंतर तुमच्या मुलाला दोन महिन्यांत नोकरी लावून देतो, नोकरी नाही लागली तर पैसे परत देईन, असे सांगून त्याने आयसीआय बॅंकेचा धनादेशही जाधव यांच्याकडे दिला. परंतु, दोन महिने उलटून गेल्यानंतर जाधव यांनी पिलावरे आणि धोत्रे यांच्याकडे मुलाला नोकरी कधी लावणार, असे विचारले असता या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले. काही दिवसानंतर संशयितांनी फोन बंद करून ठेवले.
जाधव यांना विशाल पिलावरे एक दिवशी राजवाड्याजवळ भेटला. त्यावेळी जाधव यांनी मुलाच्या नोकरीबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यामुळे माजी सैनिक विलास जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.