सर्व नगरसेवक आक्रमक : सर्वसाधाण सभेत कारवाईची केली मागणी आळंदी – आळंदी शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभ्या राहत आहेत.बिल्डर मोठ्या मोठ्या इमारती उभारत असून त्यांना पाणीपुरवठा होत आहे. परवानगी नसताना स्कीमांना चार-चार इंची नळ जोड कशी देण्यात आली. मुळात मंजुरी ही पालिकेच्या सभेत चर्चा करूनच दिली जावी, असा ठराव होता; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. मोठ्या प्रमाणात बोगस नळजोड देण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने कोणालाही पाठीशी न घालता कारवाई करावी, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. आळंदी नगरपरिषदेची सर्वसाधरण सभा शुक्रवारी (दि. 3) विविध प्रश्नांनी गाजली. तसेच विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून काही कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,मुख्याधिकारी समीर भूमकर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, सागर बोरुंदीया, सचिन गिलबिले, सागर भोसले, तुषार घुंडरे, नगरसेविका प्रमिला रहाणे, स्मिता रायकर, शैला तापकीर, स्नेहल कुऱ्हाडे, प्रतिमा गोगावले, प्राजक्ता घुंडरे, मीरा पाचुंदे, पारुबाई तापकीर, रुक्मिणी कांबळे आदी पदाधिकारी व पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्याच्या अर्धवट अवस्थेतील बांधकामाकडे लक्ष वेधत पालिकेच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष वेधले. सध्याच्या पालिका प्रशासनाच्या तीन वर्षांच्या काळात त्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पाच वर्षांपासून पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. सध्याच्या बॉडीने देखील त्यावर काहीच न बोलणे हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी ते काम मार्गी लावण्याची मागणी केली. शहरात पाणीप्रश्न बिकट बनला आहे. आम्ही सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत; मात्र चोराच्याच उलट्या बोंबा सुरू आहेत हे योग्य नाही, तात्काळ बोगस नळजोड कट करा. – वैजंयता उमरगेकर, नगराध्यक्षा, आळंदी नगरपरिषद