नवी दिल्ली – विद्यार्थ्यांच्या हितासाठी जेएनयु विद्यापीठातील प्राध्यापकांनी कामावर परत रूजू व्हावे अशी सुचना विद्यापीठाच्या प्रशासनाने एका निवेदनाद्वारे केली आहे. या विद्यापीठातील शिक्षकांच्या दोन संघटनांनी विद्यार्थ्यांची बाजू घेत विद्यापीठ प्रशासनाशी असहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी वर्गात शिकवण्याचेही थांबवले आहे या संबंधात त्यांना ही सुचना करण्यात आली आहे.
विद्यापीठातील वातावरण सुरळीत व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना शिक्षकांच्या संघटनांनी असहकार पुकारणे हे विद्यापीठाच्या हिताच्या विरोधात आहे. त्यातून त्यांचा कामकाज विस्कळीत ठेवण्याचाच हेतू दिसून येतो. विद्यापीठाचे नवीन सेमिस्टर आता सुरू होत आहे. त्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना कामावर रूजू व्हावे अशी सुचना त्यांना प्रशासनाने केली आहे. तथापी शिक्षकांच्या संघटनांनी मात्र विद्यापीठाच्या प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनाला महत्वच न देण्याची भूमिका घेतली असून त्यांनी असहकार सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.