पुणे, दि. 19 – शहरातील विविध भागात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार मुकेश बबन मुने उर्फ मुन्ना (वय.24, रा. सुतारदरा कोथरुड) याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून 9 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, इतर घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
तसेच चोरीचे सोने विकत घेणारा सराफ राजन सुधाकर मिसाळ (वय.53.रा. अहमदनगर) याला देखील अटक करण्यात आली आहे. मुन्ना हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल 49 गुन्हे दाखल आहेत.
मुन्ना हा अतिशय शातीर गुन्हेगार असून, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो सतत वास्तव्याची ठिकाणे बदलत होता. फरार कालावधीत तो पनवेल, भोसरी, खोपोली आणि औरंगाबाद येथे फिरला आहे. मात्र, शहरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो चोरी करतान कैद झाला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुन्नाला अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल अडीचशे कॅमेरे तपासले.
25 फेब्रुवारी 2021 रोजी मित्रमंडळ कॉलनी येथे मिहीर श्रीराम भागवत यांच्या घरी भरदिवसा आठ लाखाची घरफोडी झाली होती. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, ही घरफोडी मुन्ना याने केल्याचे समोर आले. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान पोलिस कर्मचारी अमित सुर्वे आणि राहुल ओलेकर यांना मुन्ना हा पाटे संस्कृती सहकारनगर येथे आला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, राजू जाधव, अंमलदार अमित सुर्वे, राहुल ओलेकर, शरद राऊत, शिवाजी क्ष्रीरसागर, महेश गाढवे, नवनाथ भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.