अरेरे! जेट एअरवेजची काय ही अवस्था; टॉवेल-ट्रॉली आणि कपबशांचा लिलाव

एक काळ असा होती की, जेट एअरवेज कंपनी विमानातील पहिल्या वर्गातील प्रवाशांना रोझेनथाल क्रोकरी आणि विल्यम एडवर्ड सिरॅमिक वेअर या सुप्रसिद्ध ब्रँडच्या प्लेट आणि कपबशांमधून चहा-कॉफी आणि खाद्यपदार्थ देत असे. आता दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीच्या विमानतील क्रोकरी आणि कटलरी तसेच टॉवेल-ट्रॉली आणि अशाच अनेक गोष्टींचा लिलाव केला जात आहे. 

नेदरलँडमधील एच. एस्सेर फायनान्स कंपनी आणि वॉलेनबर्न ट्रान्सपोर्टची सुमारे 280 कोटी रुपयांची देणी जेट एअरवेजने थकवली असून त्याच्या वसुलीसाठी नेदरलँडमधील बीव्हीए ऑक्शन्स या लिलाव करणाऱ्या कंपनीने नोटीस लावली आहे. त्यामध्ये महागड्या अशा वेगवेगळ्या 117 वस्तुंचा समावेश आहे. त्यासाठी 1100 हून अधिक बोली लावण्यात आल्या. त्यामध्ये चार ट्रॉली 520 युरोला विकण्यात आल्या. 90 सुती टॉवेलचा गठ्ठा 51 युरोला तर 16 नाईटड्रेस 71 युरोला विकले गेले. कटलरी सेट 25 युरोप्रमाणे विकले गेले. 31 ऑगस्टला हा लिलाव संपला.

कंपनीच्या लोगोवरून फ्लाईंग सन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीची आठवण म्हणून माजी कर्मचारी विमलकुमार राय यांनी काही वस्तूंची खरेदी केली. त्याबाबतची माहिती त्यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे. ते म्हणतात, ही माझ्यासाठी कटू आणि वेदनादायी आठवण आहे. त्यांनी 2008 ते 2011 या कालवधीत जेट एअरवेजमध्ये काम केले आहे.

ते म्हणतात, मला अजूनही आठवते 2010 च्या उन्हाळ्यातील ही गोष्ट आहे. मी कंपनीच्या हॅमरस्मिथ येथील ऑफिसमधील एका संध्याकाळी बसलो होतो. समोर विल्यम्सच्या अतिशय देखण्या आणि सुंदर प्लेट, कपबशा होत्या. जाड सोनेरी कडा असलेली ती क्रोकरी खरोखरच आता एक आठवण ठरली आहे. ते कंपनीच्या वैभवाचे दिवस होते. अगदी पाण्याचा ग्लास देण्याचीही कंपनीची एक पद्धत होती.

जेट एअरवेजने स्वतःचा सगळा व्यवसाय नेदरलँडमधील आघाडीची विमान वाहतूक कंपनी केएलएम रॉयल डच एअरलाईन्सला विकला आहे. कंपनीच्या दोन देणेकऱ्यांनी तेथील न्यायालयात तक्रार केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ही लिलाव प्रक्रिया पार पडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.