न्यूयॉर्क – ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पुढील महिन्यात अंतराळात जाणार आहेत. आपल्या स्वतःच्या मालकीच्या ब्लू ओरिजिन या रॉकेट कंपनीच्या रॉकेटमधूनच ते या अंतराळ सफरीवर जाणार आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षापासून आपल्याला अंतराळात जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. जूनच्या महिन्यात, 20 जुलैला बंधूसमवेत मी अंतराळात जाणार आहे, असे बेझोस यांनी इन्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये सांगितले.
या अंतराळ प्रवासासाठी ब्लू ओरिजिनीकडे 136 देशांमधून तब्बल 5,200 जणांनी अर्ज केले होते. निवडीसाठी लिलावाची पहिली फेरी गेल्या महिन्यात झाली आहे. सर्वाधिक अर्ज कोणत्या देशातून आले हे मात्र कंपनीने सांगितलेले नाही. दुसऱ्या फेरीसाठी 23.8 दशलक्ष डॉलरची बोली लावली गेली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ऑनलाइन लिलावाची ही प्रक्रिया 10 जूनपर्यंत चालणार आहे, तर 12 जूनला अंतिम फेरी होणार आहे.
ब्लू ओरिजिनची ही अंतराळ सफर 20 जुलैला सुरू होणे अपेक्षित आहे. अंतराळात खासगी प्रवास सफर आयोजित केली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. या एका सफरीसाठी 2 लाख डॉलर आकारले जाणार असल्याचे कंपनीने 2018 मध्येच जाहीर केले आहे.