नवी दिल्ली – भाजपची सत्ता असणाऱ्या आणि नेतृत्वबदलाची चर्चा असणाऱ्या कर्नाटक, उत्तरप्रदेश या राज्यांच्या यादीत आता मध्यप्रदेशची भर पडली आहे. भाजपकडून सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रांमुळे त्या पक्षाच्या संबंधित प्रदेश शाखांमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. अर्थात, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून तूर्त तरी तीन राज्यांतील खांदेपालटाच्या चर्चा फेटाळण्यात आल्या आहेत.
अनेक महिन्यांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चा आहेत. भाजपच्याच काही आमदारांकडून मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना हटवण्यासाठी मोहीम सुरू असल्याच्या बातम्याही येत आहेत. अशात त्या राज्यात येडियुरप्पा यांना समर्थन असणाऱ्या भाजप आमदारांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटकात नेतृत्वाबदल होणार नसल्याचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने याआधीच सूचित केले आहे. मात्र, स्वाक्षरी मोहिमेमुळे त्या राज्यात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तरप्रदेश संदर्भातही मागील काही दिवसांपासून भाजपच्या विविध स्तरांवर बैठकांचे सत्र सुरू आहे. विविध आघाड्यांवर आणि विशेषत: करोना संकट हाताळण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सपशेल अपयश आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात भाजपमधील विचारमंथनामुळे उत्तरप्रदेशातील नेतृत्वाबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
कर्नाटक आणि उत्तरप्रदेश ही राज्ये राजकीय चर्चांचा आखाडा बनली असतानाच मध्यप्रदेशबाबतची चर्चाही समोर आली. त्या राज्यातील भाजपचे वजनदार नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नुकत्याच काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पर्याय म्हणून विजयवर्गीय यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. अर्थात, स्वत: विजयवर्गीय यांनी मध्यप्रदेशात नेतृत्वबदलाची चर्चा फेटाळून लावली.