मुंबई – करोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव करोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. गावामध्ये करोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी. तसेच गावात विविध उपाययोजना राबवून “माझे गाव, करोनामुक्त गाव’चे ध्येय साध्य करावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑनलाइन प्रणालीद्वारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले की, अजूनही करोना संपलेला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. सारखा-सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणार नाही. यासाठी सर्व गावांनी आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि त्या माध्यमातून संपूर्ण राज्य कसे करोनामुक्त होईल यासाठी पुढाकार घ्यावा. हे काम चळवळीच्या स्वरूपात करावे.
जोपर्यंत करोना आहे, तोपर्यंत गावकरी सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळतील याची काळजी घ्यावी. गावात कोठेही सभा, समारंभ, लग्नसोहळे, मोर्चे, आंदोलने यांसारखी गर्दी जमवणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
गावात काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी हेच गावच्या व्यवस्थेच्या पाठकणा आहेत. या सर्वांनी करोनामुक्तीसाठी आतापर्यंत भरीव काम केले आहे. आता तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन चळवळीच्या स्वरूपात काम करावे आणि करोनाला गावातून हद्दपार करावे, असे आवाहन त्यांनी केले.
लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा
पहिली लाट ओसरल्यानंतर आपण थोडेसे गाफील राहिलो. त्यामुळे दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. आता तिसरी लाट येणार नाही यासाठी सर्व पातळ्यांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे. लसीकरणाचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होईल, यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा. म्युकरमायकोसिसचे नवीन आव्हान आपल्यासमोर आले आहे. यालाही रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा. ठरवले तर गाव करोनामुक्त होऊ शकते हे हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. त्याच धर्तीवर सर्व सरपंचांनी पुढाकार घेऊन आपापले गाव करोनामुक्त करावे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.