न्यूयॉर्क – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील बदनामीचा खटला माजी आर्थिक सल्लागर जीन कॅरोल यांनी जिंकला आहे. यामुळे जीन कॅरोल यांना ट्र्म्प यांच्याकडून तब्बल १८.३ दशलक्ष डॉलरची भरपाई मिळणार आहे. न्यूयॉर्क सिटीमधील ज्युरींनी शुक्रवारी या प्रकरणावर निकाल दिला.
ट्रम्प यांनी कॅरोल यांना १८.३ दशलक्ष डॉलर भरपाई म्हणून द्यावेत. तसेच २०१९ पासून खोटी आणि बदनामीकारक वक्तव्ये करून त्यांच्या प्रतिमेची हानी केल्याबद्दल आणि मानसिक त्रास झाल्याबद्दल ६५ दशलक्ष डॉलर दंडापोटी भरावेत असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
मॅनहटनमधील आलिशान डिपार्टमेंट स्टोअरमध्ये १९९० मध्ये ट्रम्प यांनी असभ्य वर्तवणूक केली होती, असा आरोप कॅरोल यांनी फॉर या आपल्या पुस्तकात केला होता. ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते आणि कॅरोल या खोटारड्या असल्याचे म्हटले होते.
त्या राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले होते. आपण कॅरोल यांना कधीच भेटलो नाही, असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र त्या दोघांचे १९८७ मधील एकत्र फोटोही प्रसिद्ध झाले होते.
कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर २०१९ मध्ये बदनामीचा खटला दाखल केला होता. ट्रम्प यांंनी आपले शोषण केले आणि वारंवार बदनामी केली असा आरोप करत त्यांनी २०२२ मध्ये आणखीन एक खटलाही ट्रम्प यांच्याविरोधात दाखल केला होता.
यापैकी लैंगिक शोषणाच्या खटल्यामध्ये ट्रम्प यांना जून २०२२ मध्ये दोषी देखील ठरवण्यात आले आहे आणि कॅरोल यांना ५ दशलक्ष डॉलरची भरपाई देण्याचे आदेशही ट्रम्प यांना देण्यात आले आहेत.