नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. सिंह यांच्या राजविरोधी मोहिमेला भाजपचा मित्रपक्ष जेडीयूने पाठिंबा दिला आहे.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मात्र, उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, असा निर्धार सिंह यांनी केला आहे. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू सिंह यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. जेडीयूचे प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी सोमवारी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली.
मनसेने याआधी वारंवार उत्तर भारतीयांचा छळ आणि अपमान केला. त्याबद्दल राज यांनी माफी मागायलाच हवी. तसेच, पुन्हा उत्तर भारतीयांना विरोध करणार नसल्याची ग्वाही द्यायला हवी. तसे घडले तरच त्यांच्या विरोधातील मोहीम मागे घेतली जाईल. अन्यथा, राज यांनी रिटर्न तिकीट घेऊनच लखनौ विमानतळावर यावे. सिंह यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या राजविरोधी मोहिमेला जेडीयूने पाठिंबा दर्शवला आहे, असे त्यागी यांनी नमूद केले.