“जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी आयफेल टॉवरवर… आमची मुलं कुठं जाऊन काय…”शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न दोन वर्षे फसल्यानेच आता केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते वा त्यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात आहे वा भीती दाखविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला होता. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच पवारांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मुलाने एका मुलीला प्रपोज केल्याचा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये एकच  हास्यकल्लोळ झाला.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या मुलासंदर्भातील एक खास बातमी दिली. “आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टिकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी काल संध्याकाळी (मंगळवारी) पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली.

आता आम्ही वाळवास इस्लामपूरपर्यंत सीमित नाही राहिलो. आम्ही एकदम पॅरिस वगैरेला जातो,” असं पवार म्हणाले. पुढे बोलताना, “ठिकाण इंटरनॅशनल असेल, पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल. आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही,” असे पवार यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, केंद्रीय तपस यंत्रणांचा वापर केंद्र सरकारीकडून करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाडू शकत नाही. उलट हे सरकार पाच वर्षे टिकणार हे लक्षात आल्यानेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तिकर विभागाचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला आहे, असा आरोपदेखील शरद पवारांनी केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.