जम्मू -जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला.
पूँच जिल्ह्याच्या कृष्णा घाटी क्षेत्रात सज्ज असलेल्या भारतीय जवानांनी पहाटेच्या सुमारास संशयास्पद हालचाली हेरल्या. दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या त्यांच्या ध्यानात आले.
त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. जवानांच्या माऱ्याला घाबरून दहशतवाद्यांनी माघारी पलायन केले. मात्र, चकमकीत राहुल सुलगेकर हे जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नजीकच्या वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, संबंधित घटनेवेळी दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सुलभ व्हावे या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. त्यामुळे त्या देशाच्या नापाक कुरापतीवर पुन्हा प्रकाश पडला.