जपान बॅडमिंटन स्पर्धेत साईप्रणीत दुसऱ्या फेरीत

File Pic

टोकियो – भारताच्या बी.साईप्रणीतने सरळ दोन गेम्समध्ये विजय मिळवित जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली. मिश्रदुहेरीत सात्विकसाईराज रान्किरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनीही विजयी सलामी केली. पुरुषांच्या दुहेरीत मनु अत्री व बी.सुमेध रेड्डी यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

साईप्रणीतने स्थानिक खेळाडू केन्तो निशिमोतो याचा 21-17, 21-11 असा पराभव केला. त्याने 42 मिनिटांत हा सामना जिंकताना स्मॅशिंगच्या जोरकस फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये निशिमोतोने चांगली झुंज दिली. त्याने प्लेसिंगचा सुरेख खेळ केला. मात्र महत्त्वाच्या क्षणी त्याला परतीच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. पहिली गेम घेतल्यानंतर साईप्रणीतचा आत्मविश्‍वास वाढला. त्याने दुसऱ्या गेममध्ये आणखीनच वेगवान खेळ करीत निशिमोतोला फारशी संधी दिली नाही. ही गेम घेत त्याने सामनाही जिंकला. दुसऱ्या फेरीत त्याला जपानच्याच कान्ता त्सुनेयामा याच्याशी गाठ पडणार आहे.

अत्री व सुमेध रेड्डी यांना मलेशियाच्या गोह सेझ फेई यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. हा सामना मलेशियाच्या जोडीने 21-12, 21-16 असा 27 मिनिटांमध्ये जिंकला. भारतीय जोडीने उल्लेखनीय लढत दिली. मात्र त्यांनी महत्त्वाच्या क्षणी अक्षम्य चुका करीत हाराकिरी केली.

रान्किरेड्डी व पोनप्पा यांनी जर्मनीच्या मेर्विन सिडेल व लिंडा एफलर यांच्यावर 21-14, 21-19 असा विजय मिळविला. त्यांनी ड्रॉपशॉट्‌सचा चांगला खेळ केला. दुसऱ्या गेममध्ये त्यांना जर्मन जोडीकडून थोडासा प्रतिकार झाला. तथापि भारतीय खेळाडूंनी खेळावर नियंत्रण ठेवीत विजयश्री संपादन केली. भारताच्या पी.व्ही.सिंधू व किदम्बी श्रीकांत यांचे एकेरीचे सामने आज होणार आहेत. सिंधूपुढे चीनच्या युई हान हिचे आव्हान असणार आहे तर श्रीकांतला भारताच्याच एच.एस.प्रणोयशी खेळावे लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)