मुंबई – दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. याशिवाय या चित्रपटातील ‘तू क्या मिले’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. मात्र सध्या कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे समीकरण सुरू आहे. याच्यात आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. या चित्रपटातील एक सीन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. ट्रेलरमध्ये हा सीन पाहायला मिळत आहे. या सीनमध्ये रणवीर सिंह 3 महिन्यांसाठी आलिया भट्टच्या घरी जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. तेव्हा त्याचे लक्ष रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे फोटोकडे जाते आणि तो त्यांना रानी अर्थात आलियाचे आजोबा म्हणून त्यांच्या पाया पडतो. हा सीन विनोदी शैलीतून दाखवण्यात आला आहे. यावरच नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे.
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, “बॉलीवूड कधीच भूतकाळातून शिकणार नाही. रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान कसा करू शकता? भारताच्या इतिहासात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अशा व्यक्तीचा अपमान हा सहन करू शकत नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “एखाद्या महान व्यक्तीचा अनादर करणे अजिबात मान्य नाही. रवींद्रनाथ टागोर यांच्यावर विनोद करण्याचे धाडस कसे झाले?”
दरम्यान, हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. कॉमेडी आणि रोमान्सचा तडकाही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.