जामखेडला नवमतदार नोंदणी अभियानास प्रारंभ

भाजपकडून 25 ठिकणी मतदार नोंदणी स्टॉल : राष्ट्रवादीकडून होम टू होम नोंदणी

जामखेड – जामखेड तालुक्‍यात नवमतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भाजपने शहरासह तालुक्‍यातील प्रमुख गावांत 26 स्टॉल उभारून मतदार नोंदणी कार्यक्रमात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीकडूनही नवमतदार नोंदणीसाठी थेट होम टू होम नोंदणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्‍यात आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्याने दिसून येत आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे पणन व वस्त्रोद्योगमंत्री व विद्यमान आमदार राम शिंदे, तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार, यात शंका नाही. सध्या भाजप, राष्ट्रवादीने प्रचारासाठी जोरदार कंबर कसली आहे. तालुक्‍यातील नवमतदारांच्या नोंदणी अभियानाला जोमाने सुरुवात केली आहे. भाजपने जामखेड शहरात 3 ते 4 ठिकाणी तसेच तालुक्‍यात 22 ठिकाणी मतदार नोंदणी करण्यासाठी स्टॉल उभारले असून, याव्दारे नवमतदार नोंदणी केली जात आहे.

राष्ट्रवादीकडून थेट होम टू होम जाऊन मतदारांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करून घेतली जात आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून स्वत्रंत यंत्रणा उभारण्यात आली आहे. या मतदार नोंदणी करण्यासाठी नेमलेल्या तरुणांनाही यामुळे रोजगार मिळत आहे. अनेक वेळा नवमतदारांचे मतसुद्धा एखाद्या निवडणुकीचे चित्र पालटून टाकते. त्यामुळे मतदार नोंदणी अभियानाला विशेष महत्त्व आहे. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी मंत्र्यांसह सर्व पदाधिकाऱ्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते जोमाने प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादीकडूनही जोरदार मतदार नोंदणी केली जात असल्याने आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. चौकाचौकांत आणि प्रभागांत मतदार नोंदणी अभियान सुरू असून, नोंदणीस प्रतिसाद देखील चांगला आहे.

भारतीय संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला आहे. तसेच सर्वांच्या मताला समान किंमत आहे. त्यामुळे मी मतदानासाठी उत्सुक आहे. माझे एक मत मोलाचे असल्याने हुशार, सुशिक्षित, उमेदवाराचाच विचार करणार आहे.

आनंद जाधव

यावर्षी अनेक नवमतदार मतदान करणार आहेत. यावेळी उमेदवाराची प्रतिमा आणि कार्याचा विचार मी निश्‍चित करेल. उमेदवाराने संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळवून देऊन सर्वसमावेशक विकास साधला पाहिजे. तरुणांसाठीच्या योजना राबवून शिक्षण, रोजगाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे.

स्वप्नील जाधव नवमतदार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)