सीनाकाठी बिबट्याचा मुक्त संचार

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दक्षता घेण्याचे वनविभागाचे आवाहन

नगर  – शहरातील नालेगाव ते बुरुडगाव सीनानदी पात्राभोवती बिबट्याचा मुक्त वावर असल्याने परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

येथील नालेगाव परिसरापासून ते बुरुडगावपर्यंत बिबट्या व त्याची दोन पिल्ले नागरिकांना दिसल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 20 जुलैपासून या परिसरात बिबट्याचा संचार आहे. सीनानदी पात्राभोवती उसाचे मोठया प्रमाणात क्षेत्र असल्याने बिबट्याला आश्रयासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. वनविभागाने बुरुडगाव जवळील दरंदले वस्ती येथे पिंजरा लावला आहे. तीन दिवसांपूर्वी गणेश दरंदले यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीवर हल्ला केला. तसेच परिसरातल्या अनेक कुत्र्यांवर हल्ले करून कुत्र्यांना लक्ष्य केलेले आहे.

बुरुडगावमध्येही एका घोड्यावर बिबट्याने हल्ला केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे घोड्याला वाचवण्यात यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थिटे यांनी सांगितले की, बिबट्याचा वावर वारुळाचा मारुती मंदिर नालेगाव ते बुरुगाव सीनानदी पत्राभोवती असून बुरुडगाव परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे. नदी पत्राभोवती उसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात असल्याने बिबट्या पकडण्यामध्ये अडचण येत आहे. तरीही वनविभागाने बिबट्याला पकडण्याची एक पथक तयार केलेले आहे. आतापर्यंत बिबट्याने एक शेळी व अनेक कुत्रे यांना लक्ष्य केलेले आहे.

नागरिकांना घाबरून न जाता बिबट्याच्या वावर क्षेत्रात वावरतांना हातात घुंगराची काठी, रात्रीच्या वेळी टॉर्च, मोबाईल, रेडिओवर गाणी वाजवावी, बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात उघड्यावर शौचास जाऊ नये, घरापासून ऊस शेतीचे अंतर 29 ते 30 फूट असावे, लहान मुलांवर लक्ष्य द्यावे, घराला बंधिस्त जाळीचे कुंपण असावे, पाळीव प्राण्यावर हल्ला रोखण्यासाठी बंदिस्त गोठा करावा, घराभोवती परिसर स्वच्छ ठेवावा, झुडपे काढून टाकावीत, लहान मुले शाळेत जाताना समूहाने जावे, घराच्या आजूबाजूस दिवे असावीत, बिबट्या दिसल्यास पाठलाग करू नये, मेंढपाळ व ऊस तोडणी कामगार यांनी विशेष दक्षता घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन थिटे यांनी केले.

ग्रामपंचायतीने नागरिकांना दक्षता घेण्याबाबत दवंडी दिलेली आहे. बिबट्याचे अनेकांना दर्शन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने व्यापक मोहीम हाती घेऊन बिबट्याला पकडून परिसर मुक्त करावा.

अर्चना बापूसाहेब कुलट , सरपंच, बुरुडगाव. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)