शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी शंकर जांभळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिरूर हर्षित तावरे यांनी जाहीर केले.
शिरूर बाजार समितीच्या सभापतिपदीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. तर अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे “फिल्डिंग’ही लावली होती. परंतु अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे दिलेल्या बंद लिफाफा निवडणूक निरीक्षक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्फत पाठवण्यात आला. या लिफाफ्यात संचालक शंकर जांभळकर यांचे नाव सभापतिसाठी आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या उपस्थितीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले.
दरम्यान, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर सोमवारी (दि. 29) शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी विशेष सभा बोलवली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर व वसंत कोरेकर यांची नावे आघाडीवर होती. परंतु आजच्या या निवडणुकीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर झाल्याने 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे संचालक शशिकांत दसगुडे, विश्वास ढमढेरे, प्रकाश पवार, शंकर जांभळकर, वसंत कोरेकर, मंदाकिनी पवार, विकास शिवले, सतीश कोळपे, मानसिंग पाचुंदकर, धैर्यशील उर्फ बाबाराजे मांढरे, तृप्ती भरणे, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, सुदीप गुंदेचा, बंडु जाधव, बाबासाहेब सासवडे. तर भाजपचे संचालक संतोष मोरे, छाया बेनके. तसेच शिरूर बाजार समिती सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.
पतीसह भाजप संचालकाच्या हाती “घड्याळ’
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 19 संचालक असून, यातील18 संचालकांना मतदानाचा हक्क असून पणन प्रक्रिया संचालकाला मतदानाचा हक्क नसल्याने त्यात राष्ट्रवादीचे 15 तर भाजपचे 3 संचालक आहेत. भाजपचे बाजार समिती संचालिका छाया बेनके यांनी त्यांचे पती संभाजी बेनके यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद आणखीच वाढली आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सर्वांच्या आदेशानुसार झाली आहे. यापुढील काळात बाजार समितीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. आंतरिक तहामुळे इतर काही जणांनाही संधी मिळणार आहे.
– अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतिपदासाठी संधी मिळाली असून शिरूर बाजार समितीची सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेणार आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे व शेतकऱ्यांना फायदा होईल असे निर्णय घेतले जातील याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल. या निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार यांचा विश्वास सार्थ ठरविणार आहे.
– शंकर जांभळकर, नवनिर्वाचित सभापती, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती