जळगाव – मालोद (ता. यावल) येथील तलाठी कार्यालयातील कोतवालास पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. जहांगिर तडवी असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शेतजमीन सातबारावरील इतर अधिकारी नोंदमधील तक्रारदार यांचे बहिणीचे नाव मंडळ अधिकाऱ्याकडून कमी करवून देण्यासाठी लाच मागितली होती. किनगाव मंडळाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या एका स्टेशनरी दुकानासमोर सापळा रचून पथकाने तडवी यास रंगेहात अटक केली.
सविस्तर माहिती अशी की, सावखेडासिम (ता. यावल) येथील शेतजमीनचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारी नोंदमधील तक्रारदार यांची बहिणीने नाव मंडळ अधिकारी किनगाव यांचेकडून कमी करवून देण्याचे सांगितले. त्यासाठी आरोपी तडवी याने मंडळ अधिकारी किनगाव यांचे नावाने तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून पथकाने तडवीला पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक केली. या कारवाईमुळे किनगावसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.