मुंबई – दक्षिणेतील अभिनेता ‘सुर्या’चा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ चित्रपटातील एका दृश्यामुळे एक नवा वाद उभा राहिला आहे. या चित्रपटातील एक पात्र दुसऱ्या पात्राला हिंदीत बोलल्याबद्दल कानशिलात लगावताना दिसतंय. त्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. हा सीन अभिनेते प्रकाश राजशी संबधित आहे.
‘जय भीम’ चित्रपटात हा सीन मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी टाकला असून, हे दृश्य हिंदी भाषिक लोकांच्या विरोधात असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. त्यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली आहे. दरम्यान, वाढता वाद पाहता अखेर प्रकाश राज यांनी मौन सोडत आपले मत व्यक्त केलं आहे.
“जे लोक ‘जय भीम’मधील दृश्यावरून टीका करताय, त्यांनी स्वत: आपला अजेंडा उघड केला.” एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश राज म्हणाले की, “जय भीम सारखा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना आदिवासींच्या व्यथा दिसल्या नाहीत, त्यांना अन्यायाची भीती दिसली नाही. त्यांना फक्त ती एक थप्पड दिसली. एवढंच त्यांना समजलं. त्यामुळे त्यांचा अजेंडा स्पष्ट होतो.”
नेमका काय होता चित्रपटातील वादग्रस्त सीन –
‘जय भीम’ या चित्रपटात अभिनेते प्रकाश राज पोलिसाच्या भूमिकेत दिसून येतात. प्रकाश राज एका व्यक्तीची चौकशी करत असताना तो व्यक्ती हिंदीत बोलतो, त्यावर प्रकाश राजने त्याला थप्पड मारली आहे. त्यामुळे या चित्रपटात जाणूनबुजून हिंदी भाषिकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.