JaganMohan Reddy – वायएसआर कॉंग्रेसचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज केली. आंध्र प्रदेशात लोकसभे सोबतच राज्य विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. जगन यांनी विधानसभेच्या १७५ उमेदवारांची नावेही आज जाहीर केली.
आज म्हणजे इडुपुलापाया येथे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. एकाच टप्प्यात त्यांनी लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. या राज्यात तेलगु देसम पक्ष, जनसेना पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची आघाडी झाली आहे.
त्यामुळे जगन यांच्यासमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे तसेच लोकसभेवरही जास्तीत जास्त खासादार पाठवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या सरकारची कामगिरी फार निराशाजनक नसली तरी सरकारच्या विरोधातील नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो असेही मानले जात आहे.
त्यामुळे जगन यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए किंवा कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी इंडिया यांच्यापासून समान अंतर राखत स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला आहे व त्यानुसार त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
पाच वर्षांपूर्वी त्यांनी संपूर्ण आंध्र प्रदेशात यात्रा करत जनमत आपल्या बाजूने वळवून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते. दिल्लीतही त्यांनी जास्त खासदार पाठवून आपली स्थिती भक्कम केली होती. त्यावेळी त्यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला त्यांच्यासोबत होत्या.
मात्र नंतर त्यांच्या बहिणीने वेगळा पक्ष काढत त्या तेलंगणाच्या राजकारणात सक्रिय झाल्या. आता त्यांच्या बहिणीनेही कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जगन यांना घरच्या आघाडीवरही लढा द्यावा लागणार आहे.