बुलढाणा – खासदार ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘जब तक सूरज चांद रहेगा औरंगजेब तेरा नाम रहेगा’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर सभेमध्ये काही क्षण गोंधळ झाला होता. या प्रकारानंतर राज्यात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
बुलढाण्यामध्ये खासदार ओवैसींच्या भाषणादरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना ओवैसींनी यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र तरीही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारानंतर सालीपुरा भागात पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच या प्रकरणाची पोलिस चौकशी करत असून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथील संदल मिरवणुकीत समजाकंटकांनी जाणीवपूर्वक औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक झळकावून व हिंदू विरोधी घोषणा देत हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याशिवाय कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवण्यावरून दोन समाजामध्ये तणाव पसरला होता. यामुळे कोल्हापूर शहरात बंदची हाक देण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका करण्यात आली.